Thursday, 20 December 2012

एप्रिल दिनविशेष

१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला.  पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड.  सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग. मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले ‘नवरसतारा’. पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा ‘सज्जनगड’ म्हणून नामकरण विधी केला.
२ एप्रिल १६७९
दिलेरखान व संभाजी राजांचा भूपालगडावर कब्जा. ७०० मराठ्यांचे हात तुटले.  भूपालगड. हा गड सातारा – मिरज परिसरात आहे. सातार्‍याहून मायणीस जावे. मायणीस येऊन ‘विटे’ येथे जावे. खानापूरमार्गे जतकडे जाणार्‍या एस टीने पळशीस उतरावे. पूर्वेला कोळदुर्ग ते भूपालगड डोंगररांग आहे. स्वरूप पठारीच आहे. शंभू महादेव रांगेत सीताबाई डोंगरातून निघालेल्या डोंगरातून धावणार्‍या महिमान फाट्यावर हा भूपालगड आहे. ही रांग पूर्वेला माणगंगा आणी पश्चिमेला येरळा खोरे विभागते. संभाजी राजे या कालखंडात दिलेरखानास मिळाले होते. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान. असे का घडले असावे याचे अनेक तर्क बांधता येतील. पण ते हे स्थळ नव्हे ! भूपालगडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. संभाजी राज्यांविरूद्ध त्यांनी तलवार उचलली नाही. गड संभाजीराजे व दिलेरखानाच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच गडा-गडांवर निरोप धाडले की संभाजी राजे जातीने आले तरी तरवार चालवणे. गड ताब्यात न देणे. अखेर शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड बुद्धीकौशल्याच्या बळावर संभाजी राजांना पुन्हा रायगडावर बोलावून घेण्यात यश मिळवले व त्यांची समजूत काढली. मग मात्र संभाजी राजांचे डोळे उघडले व अशी चूक पून्हा त्यांनी कधीही केली नाही.
३ एप्रिल १६६२
मोरोपंत पिंगळे हे आतापर्यंत मुजुमदारी करीत होते. त्यांची ही मुजुमदारी निळोपंत सोनदेवांस दिली. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पेशवे पद दिले.
३ एप्रिल १६६७
आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला. आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.
४ एप्रिल १६७०
नगर मध्ये मराठे घुसलेले पाहून दाऊदखान कुरेशी हा खानदेशातून त्वरेने अहंमदनगरास ७००० स्वारांसह आलेला होता. मग नगर मध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊद खान त्यांच्या मागे हात धूऊन पळत सुटला. जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पूरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. पुढे दाउद खान नगरहून औरंगाबादेस गेला आणि मराठे पुन्हा नगरमध्ये घुसले व त्यांनी तेथील ५१ गावे लुटली.
६ एप्रिल १६६३, मध्यरात्री १२ नंतर
महाराजांनी छापा घालून शाईस्तेखानाला उडवायचा मनसुबा आखला. छाप्यासाठी मुहुर्त निवडला चैत्र शुद्ध अष्टमीच्या ढळत्या मध्यरात्रीचा. ऐन मध्यरात्र. सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला. महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले.
८ एप्रिल १६५७
२७ वर्षीय शिवाजीराजे यांचा जाधवरावांच्या काशीबाई यांच्याशी विवाह.
८ एप्रिल १६६३
नबाब शाईस्तेखान पुणे सोडून औरंगाबादला बोंबलत गेला.
८ एप्रिल १६७४
चिपळूण येथे शिवाजी महाराजांनी लष्कराची पाहणी केली.
राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद हंभिरराव मोहिते यांस बहाल.
९ एप्रिल १६६९
सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन-दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला या पाशवी हुकुमानेछ जणू निसर्ग थरारला होता
९ एप्रिल १६७० रोजी औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा ही ९ एप्रिल १६७० ला वारली .
९ एप्रिल पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तशामखान हा मेला;यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली.
१० एप्रिल १६६०
राजापूरचा प्रसंग विसरून इंग्रज पन्हाळ्याच्या वेढ्यात मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात ब्रिटिश निशाण उभारून स्वतःच्या तोफा डागायला सुरूवात केली.
१३ एप्रिल १६६३
नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले. ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले.
१४ एप्रिल १६६४
जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.
१४ एप्रिल १६६५
मोगलांनी फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड जिंकला. हा किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे.
१५ एप्रिल १६७३
प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले.
१६ एप्रिल १६४०
शके १५६२ विक्रमनाम संवत्सरी वैशाख शुद्ध पंचमीस म्हणजे गुरुवार दि. १६ एप्रिल १६४० रोजी निंबाळकर पवार घराण्याच्या सईबाईंशी शिवाजी महाराजांचे पहिले लग्न झाले
१८ एप्रिल १६७७
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन
२० एप्रिल १६६५ ची रात्र
शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळी पुरंदर मिर्झा राजे जयसिंह व दिलेर खान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. कशी कुणास ठाऊक ? पण केदार दरवाज्याने ही कुमक गडावर पोचली.
२३ एप्रिल १६५७
रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.
२४ एप्रिल १६७४
शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता शिवरायांचा दोन महिन्यांनी राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण महाराजांनी तसे केले नाही व जिजाबाई साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.
२९ एप्रिल १६६१
शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.
३० एप्रिल १६५७
शिवाजी महाराजांनी जुन्नर हे मोगली ठाणे लुटले. काही दिवसांपूर्वीच शिवाजी राजांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही महाराजांना आपला “प्रेमाचा” खलीता पाठविलेला होता. त्या खलित्यात शिवाजी महाराजांनी “मोगलांचे अधिकारी” या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती. या संमती पत्राची तारीख आहे २३ एप्रिल १६५७. जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहाजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवाजी नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाला. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयाची खंडणी गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही.

Wednesday, 19 December 2012

मार्च दिनविशेष

२ मार्च १६६०
सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. .
२ मार्च १७००
शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांचे सिंहगड येथे निधन
३ मार्च १६७९
मोरोपंत पेशव्यांनी विजापूरकरांकडून कोप्पळ जिंकले.
३ मार्च शिवजयंती – फाल्गुन वद्य तृतीया (शके १५५१)
शिवजयंती.  हिंदुपदपादशाहीच्या ‘मंत्राची’ जयंती.  जिजाऊ आऊसाहेबांच्या ‘शिवबाची’ जयंती. तानाजी रावांच्या ‘मैतराची’ जयंती. बाजी प्रभूंच्या ‘प्राणाची’ जयंती. कवीराज भूषणाच्या ‘सरजा शेर शिवराजाची’ जयंती. सह्यदेवतेच्या अन् दर्या भवानीच्या ‘उपासकाची’ जयंती. समर्थ रामदास स्वामींच्या ‘शिवकल्याण राजाची’ जयंती. शंभुबाळाच्या आबासाहेबांची ‘म्लेंछक्षयदीक्षितांची’ जयंती. राष्ट्रपुरूषाची जयंती. “राष्ट्रपित्याने” वर्णिलेल्या ‘वाट चूकलेल्या देशभक्ताची’ जयंती.  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुनृसिंहाची’ जयंती. शाहिराच्या डफावर कडाडणार्‍या वीररसाची जयंती. कलियुगातील भगिरथाची जयंती. महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानच्या अस्मितेची जयंती.  छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती. नव्हे – नव्हे ही तर महाराष्ट्र मनाच्या महादेव ईश्वराचीच जयंती
 ४ मार्च १६६०
सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला. शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले.
५ मार्च १६६६, सोमवार
औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर. आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!!
६ मार्च १६७०
जिंका आदेश दिधला शिवभूपातींनी (कोंडाजी फर्जंद)
६ मार्च १६७३, रात्री
महाराजांचा अतिशय आवडता व तेवढाच महत्वाचा पन्हाळगड अद्यापपावेतो स्वराज्यात आलेला नव्हता. कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली. कोंडाजी फर्जंद हे केवळ साठ जवानांसह गडाचा कडा चढून गेले आणी त्यांनी आदिलशाही फौजेवर त्या काळोख्या मध्यरात्री हल्ला चढविला. किल्लेदार ठार झाला ! गड मिळाला ! महाराज निहायत खूश झाले कोंडाजी फर्जंदांची अस्मानी फते झाली.
७ मार्च १६४७
शिवाजी महाराजांचे राजकारणातील, विद्येच्या प्रांगणातील व क्षात्रकारणातील गुरू दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
७ मार्च १६६५
सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करित बसला होता. त्याने शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंत सिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.
८ मार्च १६७०
पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला.
ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.
९ मार्च १६७३
कोंडाजी फर्जंदांनी जिंकलेला पन्हाळगड पाहण्यासाठी शिवाजी महाराज प्रतापराव गुजरांसह रायगडाहून निघाले.
१० मार्च १६७३
रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवाजी महाराजांचा प्रतापगडावर मुक्काम. प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा.
१० मार्च १६७७
५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.
१० मार्च १६७९
शिवाजी महाराजांचे सरदार थोरले आनंदराव यांनी विजापूरकरांकडून बाळापूर जिंकले.
१५ मार्च १६६१
शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या.
१५ मार्च १६६५
मिर्झा राजे व दिलेरखान पठाण यांनी पुण्याहून पुरंदराकडे कूच केली.
१५ मार्च १६७०
शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.
१५ मार्च १६८०
राजाराम महाराजांची मुंज व लग्न. मुलगी वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.
फाल्गुन अमावस्या – छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी
उद्या पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. उद्याच्या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची ‘याद’ मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना – काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्‍या राजाच्या मस्तकाचीच गुढी – भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.  बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे ‘तख्तेकुलाह’ म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती. अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त – लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले. बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती. कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे. दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. “दीन दीन” “अल्लाहो अकबर” च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे ‘हलाल’ करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!
स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ एक तेजस्वी राजा आज स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर आपली आहूती देत आहे. आता तरी प्रसन्न हो…..!!! शंभूराजे आम्हाला माफ करा. ज्या धर्माच्या रक्षणार्थ तुम्ही स्वतःचे प्राण वेचलेत त्याच धर्मातील अभागे आम्ही, तुमच्या स्मरणार्थ वढू तुळापूरास जात नाही. तिथे तुमचे स्मरण करून २ साधी फुलेही वाहात नाही. उलट आमच्यातीलच काही हिंदु तुमच्या नावाचा दुरूपयोग राजकारणात करून त्यावर आपली पोळी भाजत आहेत. ज्या धर्मासाठी आपण बलीदान केलेत त्या धर्मा विरोधात काम करीत आहेत. आणि आम्ही आभागे हे सर्व निमूट पणे पाहात आहोत. आम्हाला क्षमा करा. आम्हाला नर्कातही जागा मिळणार नाही….आम्हाला क्षमा करा.
१५ मार्च १६८०
स्वराज्यासाठी वीरगती प्राप्त झालेल्या प्रतापराव गुजर यांच्या कन्येसोबत महाराज राजारामांचा विवाह वधूचे नाव जानकीबाई असे ठेवले
१५ मार्च १६६९
पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे समान देवून. त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले ते लग्न १५ मार्च १६६९ ला झाले
१६ मार्च १६७३
शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. कोंडाजी फर्जंदाने नूकताच काबीच केलेला पन्हाळगड ! गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकेनिवीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले. दक्षिण दरवाजावरील भालदारांनी ललकार्‍या दिल्या. गडावरचे झाडून सारे स्त्रीपुरूष त्यांचे उत्साहाने स्वागत करीत होते व दर्शन घेत होते. नंतर महाराजांनी संबंध गडाचे अति प्रेमभराने दर्शन घेतले. कोंडाजी फर्जंदाचे व गड जिंकणार्‍या सर्व चित्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक कौतूक केले. त्यांना सर्वांना खूप खूप धनदौलत देऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांची धाडसी करामत पाहून महाराजांना धन्य धन्य वाटले अन् असा मायावंत राजा मायभवानीने आपल्याला दिला म्हणून त्यांही सर्वांस धन्य धन्य वाटले.
१८ मार्च १६७९
मराठ्यांनी विजापूरकरांकडून बहादूरबिंडा जिंकले.
१८ मार्च १६८० सर्जाखानाला विजापुरी सेन्याचा मुख्य सेनापती केले . . १८ मार्च १६८८  हरजीराजे महाडिक ञिणामल्लीहून कंचीवर गेले .
१९ मार्च १६४६
शिवाजी महाराजांनी पुण्यात कसबा गणपतीचा जिर्णोद्धार करून, मंदीरास नंदादीप दिला.
१९ मार्च १६७४
शिवरायांची पत्नी काशीबाईसाहेब यांचा रायगडावर मृत्यू.
२० मार्च १६६६
नेतोजी पालकर मिर्झाराजांच्या विनंतीमुळे विजापूरकरांना सोडून मोगलांना सामील.
दि. २४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७
दक्षीण दिग्वीजयाप्रसंगी शिवरायांचा श्रीशैल्य येथे मुक्काम.
२५ मार्च १६८९
झुल्फिकारखानने मराठ्यांच्या राजधानीस (रायगडास ) वेढा दिला.
२७ मार्च १६६७
नेतोजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर. नेतोजी पालकरांचा मुहंमद कुली खान झाला.
हनुमान जयंती – छ. शिवाजी महाराज पुण्यतिथी
दोन चिरंजीव. एकांची जयंती. एकांची पुण्यतिथी. एक जन्मतःच चिरंजीव. तर एकानी मृत्योत्तर चिरंजीवपदाचे अढळपद ध्रुवासारखे झळकत ठेवलेले. छत्रपति शिवाजी महाराज अवघ्या हिंदुहृदयावर निरंतर तेवत आहेत. अक्षूण्णपणे. दोघांनिही सज्जनांचे रक्षण केले. राक्षसांचे निर्दालन केले. स्वधर्माची प्रतिष्ठापना केली. दोघांच्या वावरामध्ये मरूताचे सामर्थ्य होते. दोघांनीही भीम पराक्रम गाजवून आपली चरित्रे फुलवलेली.  हनुमंतांनी माता अंजनीच्या गर्भातून जन्म घेताच पाहिले ते सूर्य बिंब आणि त्याच्या दिशेने मार्गाक्रमण केले. शिवरायांनी देखील जन्म झाल्यानंतर आपली ध्येयनिश्चिती गाठण्यासाठी पराक्रमाचे उत्थान केले. दोघांचीही दिशा एकच होती. दोघांचेही स्वप्न एकच होते. त्यांना भगव्या रंगास कवटाळायचे होते. हनुमंतांना भगव्या सुर्यबिंबाला तर महाराजांना परमपवित्र भगव्या ध्वजाला.  दोघेही शोक हारीच आहेत. सौख्यकारीच आहेत. दोघेही पुण्यवंतच आहेत. पुण्यशिल आहेत. पावन आहेत. परितोशक आहेत. दोघांनीही आपल्या बाहुबळाने ध्वजांगे आवेशाने उचललेली आहेत. दोघेही जेव्हा पराक्रम गाजवीत होते तेव्हा काळाग्नी आणि कालरूद्र हे भयाने चळाचळा कापलेले आहेत. समरांगणात पराक्रम गाजविताना दोघांच्या दंतपंक्ती या आवेशाने आवळलेल्या गेलेल्या आहेत, नेत्रातून तेजाच्या अग्नीज्वाळा चाललेल्या आहेत, भृकुटी बळाने ताठरलेल्या आहेत. दोघांचेही चपळांग विद्युल्लतेसारखेच आहे. दोघांनिही चरित्रामध्ये संकटांवर चालून जाताना कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत, व त्यांच्या उड्डाणाची दिशा देखील ‘उत्तर’ आहे. मग महाभारत कालीन इंद्रप्रस्थ असो किंवा शिवकालीन दिल्ली-आग्रा असो. दोघांनी आपल्या पार्थ पराक्रमाने शुन्य मंडळाला भेदलेले आहे. आणि अवघ्या हिंदुजातीला पराक्रमाचा अन् दहशतवादाला संपविण्याचा दिव्य मार्ग दाखवून दिलेला आहे.
२८ मार्च १६७०
आग्र्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी उठवलेल्या वादळी झंझावताला रोखण्यासाठी औरंगेबाने दाऊदखानाला दक्षिणेत धाडले टो २८ मार्च रोजी नगरला पोहचला
२९ मार्च १६६७
सिंधुदुर्ग पूर्णत्वास आला
३० मार्च १६४५
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे – कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. हे फर्मान छ ११ सफर सु || खमस अर्बैन अलफ म्हणजे ३० मार्च १६४५ यां तारखेचे आहे
 ३१ मार्च १६६५
मिर्झा राजे जयसिंह व दिलेरखान पठाण पुरंदरच्या पायथ्याशी येऊन दाखल.

फेब्रुवारी दिनविशेष

१ फेब्रुवारी १६८९ मराठा इतिहासातील अत्यंत काळा दिवस ‘छत्रपति संभाजी महाराज’ मुघलांच्या तावडीत … !
२ फेब्रुवारी १६६१ 
शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला ‘सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -’ असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे ‘तुंगारण्य’. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती – २ फेब्रुवारी १६६१. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.
४ फेब्रुवारी १६६० 
कोकणातील दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले
४ फेब्रुवारी १६७५ 
शिवाजी महाराजांनी संभाजी राजांची रायगडावर मुंज पार पाडली.
५ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७
शिवाजी महाराजांचे भागानगर (हैद्राबाद) येथे आगमन. शिवाजी महाराजांची व कुतुबशाहाची भेट. एक महिना मुक्काम. (दक्षिण दिग्विजय प्रसंग)
माघ शुद्ध नवमी – दासबोध जयंती
माघ शुद्ध नवमी हा पवित्र दिवस आम्हाला खूप मोठी आणि शाश्वत देणगी देऊन गेला. आजच्या दिवशी समर्थ रामदासांनी शिष्योत्तम कल्याण स्वामींच्या शूभ हस्ते दास बोध लिखाणाचे काम पूर्ण केले. त्यामूळे हा दिवस दास बोध जयंती म्हणून ओळखला जातो. हे लिखाणाचे सत्कार्य शिवथर घळीत पूर्ण झाले. त्याची तेजस्वी आठवण म्हणून शिवथर घळीत दास बोध जयंती उत्सव दर वर्षी थाटामाटात साजरा केला जातो.
७ फेब्रुवारी १६९८
झुल्फिकार खानच्या ताब्यात जिंजी किल्ला आला.छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी जिंजीस वेढा दिला होता.
८ फेब १६६५
शिवाजी महाराजांनी पहिलीच आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बसनूर (वसुपूर)(कर्नाटक)या श्रीमंत शहराच्या रोखणे निघाली. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.म्हणजे राजांची पहिलीच मोठी सागरी स्वारी.
८ फेब्रुवारी माघ वद्य नवमी (दास नवमी)
उमरठ्याचे तानाजी राव मालुसरे सुभेदार म्हणजे एक बडे प्रस्थ. शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा मैतर. तानाजीरावांचे वर्णन करावे ते शाहिरांनीच ! इतरांना नाही साधायचे ते. सेवाचाकरीत अट नाही आणी निष्ठेत कधी फट नाही. सुभेदारांचा दरारा जगात राजगडावरील बालेकिल्ल्याइतकाच भारदस्त होता. मुलाचे लगीन ठरवल्यानिमित्त राजास निमंत्रण देण्यास गेलेल्या रावांनी राजाची बेचैनी ओळखली. आउसाहेबांचे मनोगत ताडले आणि सिंहगडाच्या लगीनघाईचा मान आपल्या ताब्यात घेतला. रावांचा डाव म्हणजे अस्सल हनुमंती डाव. घाल झडप की कर गडप. फुकटची मोगली मिजास दिसणार नाही त्यात. तानाजी रावांनी निवडली रात्र माघ वद्य नवमीची (दि.०४ फेब्रुवारी १६७०) !!! सिंहगडाच्या पश्चिमेकडील डोणागिरीच्या कड्याजवळ तानाजी राव ससैन्य प्रगटले. दोघे जण सरसर करीत तो बेताल डोणागिरीचा कडा “जैसे वानर चढोन जाताती” तसे चढून गेले. वर जाऊन त्यांनी दोर सोडले. स्वतः तानाजी राव फौजेसह गडावर दाखल झाले. इतक्यात उदयभान राठोड या मोगली किल्लेदाराच्या पहारेकर्‍यांनी हा हल्ला हेरला. गडावर एकदम हलकल्लोळ उडाला. तानाजी रावांनी गडावर जीव खाऊन कापणी चालवली. त्यांना ठावकी होते, की हा हल्ला फसला तर पुन्हा कधीही गडावर भगवा झेंडा लागू शकणार नाही. गडावर लगीन घाई उडाली. हिलालांच्या अक्षता उडू लागल्या. मशालींच्या पदन्यासात सिंहगड डोलू लागला. राजगडावरून ही सिंहगडावरची धांदल महाराज डोळ्यांत जीव ओतून बघत होते. आता मध्य रात्र उलटून गेली होती. चंद्र आस्मानी उगवला होता. अन् उदयभान व तानाजी राव अचानक एकमेकांसमोर आले. दोघेही कमालीचे शूर. एकाच्या अंगी इंद्राच्या ऐरावताचे बळ होते, तर एकाच्या अंगी यमराजाच्या रेड्याचे बळ होते. दात खाऊन दोघेही रणास पेटले. चित्यांसारख्या झेपा टाकून एकमेकाला ठार करण्याचा यत्न करू लागले. अन् घात झाला. तानाजी रावांची ढाल तूटली. समयास दूसरी ढाल मिळाली नाही. कुठून येणार ? तानाजी रावांनी आपले भवितव्य ओळखले. त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडासे काढून ढाली सारखे धरले. व त्यावर घाव झेलू लागले. उदयभान चेकाळून उन्मादाने सुभेदारांवर वेगात घाव घालू लागला. घनगर्जन धडधडधडते, धुरा घालिती भरडत चिरडत. आणि उदयभानचा एक घाव खाडकन तानाजी रावांवर पडला. मरता मरता सुभेदारांनिही आपल्या ठेवणीतला एक अवघड वार वैर्‍यावर घातला. दोघेही धाडकन जमिनीवर पडले व गतप्राण झाले.
मराठ्यांमध्ये हाकाटी पेटली, “सुभेदार पडले, सुभेदार पडले” अन् मराठे रण सोडून पळत सुटले. सुर्याजीने ते पाहिले अन् त्याचे काळीजच मुळी थरारून गेले. मिट्ट काळोखात सुर्याने आपले तेज प्रगट केले. कडक शब्दात त्यांनी सैन्याची हजेरी घेतली. ” अरे तूमचा बाप इथे मरून पडला आहे, अन् तूम्ही नामर्दासारखे पळून चालला आहात ? आऊ साहेब काय म्हणतील ? मागे फिरा ! मी तो दोर केव्हाच कापून काढला आहे. एकतर कड्या खालते उड्या मारून जीव द्या, नाही तर वैर्‍याचा जीव घ्या !” आणी काय आश्चर्य ? सुर्याजी रावांनी फुटलेले धरण सावरले. मराठ्यांनी कडोविकरोळीचे रण मांडले आणि सिंहगड जिंकला. महाराजांचा अन् आऊसाहेबांचा लाडका सिंहगड. जिथे उमरठ्याच्या तानाजी राव सुभेदारांनी आपले रक्त सांडले व जीव अर्पण केला. तीर्थक्षेत्र सिंहगड ! जिथे आपले अभागे हिंदू प्रेयसीच्या गळ्यात मिठ्या घालून बसतात. जिथे दारूच्या अड्याची मैफल अन् जुगाराचा फड सजतो. जिथे रेव्ह पार्टिची बदफैली साजरी होते. आमच्या अधःपतनाची सुद्धा कमाल आहे ! तीर्थक्षेत्राचे मोल आम्ही कधी जाणलेच नाही.
माघ वद्य नवमी – दास नवमी
संत रामदास स्वामींनी सज्जनगडावर समाधी घेतली.
९ फेब्रुवारी १६८९
औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजीमहाराजांना कैद केल्यानंतर रायगडच्या किल्ल्यावर महाराणी येसूबाई व किल्ल्यावरील मराठे सरदारांच्या सल्ल्याने राजाराम- महाराजांनी मंचकारोहण केले.
९ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे ‘बसनूर’ छापा घालून लूटले. महाराजांनी बसनूरवरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली. राजाने नौकाप्रवास करून सागर उलंघू नये ही हिंदू धर्मातील खूळचट रूढी उडवून लावली. शिवराय किंवा सावरकर काय ! दोघेही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते, पण धर्मातील खूळचट रूढींना दोघांनिही आपल्या चरित्रात मूळीच थारा दिला नाही.
१० फेब्रुवारी १६७१
सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती.
महाशिवरात्र – प्रताप राव गुजर पुण्यतिथी
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणास धर्मवाट दिली.महाराजांना ही बातमी समजताच.त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले -
“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका. सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव ! शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.”
तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते. अन् एक दिवस उगवला – बळीचा दिवस. (दि.२४ फेब्रुवारी १६७४) या दिवशी महाशिवरात्र होती. प्रताप राव गुजर आपल्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान ४०,००० फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतीचा मुजरा झडणार नव्हता ! का ? तर “बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता. बहलोल खानाच नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. रावांच्या डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या. विजेच्या चपळाईने प्रताप रावांनी घोड्यावर मांड टाकली व घोड्याला टाच मारली. ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले. फक्त सात. फक्त सात. सात घोडेस्वारांची मात चालली होती काळावर. जणू सुर्यरथाचे सात अश्वच पृथ्वी गिळंकृत करण्या करता सुसाट वेगाने निघालेले होते. बहलोल खानाने घटप्रभा नदी ओलांडली. नदी ओलांडल्यावर त्याला व त्याच्या फौजेला अपरंपार आनंद झाला. कारण ते आता शिवाजीच्या मुलखात घुसत होते. शिवाजीच्या मुलखात त्यांच्या घोड्याची टाप पडत होती. त्याचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे आघाडीला फडकत होते. उंटांचा व घोड्यांचा रिसाला दोन बाजूंनी दौडत सुटला होता. स्वतः बहलोल खान हत्तीवर बसला होता. आपल्या फौजेला जोश देत होता.
अन् अचानक प्रतापराव बहलोल खानावर तुटून पडले, आपल्या ६ जणांच्या “प्रचंड सैन्यानिशी.”
“इंद्रधनू विस्कटले ग्रासत, रंग उधळले नभा, सात रंग उधळले दिगंती, प्रलयभैरवी प्रभा, विलयंकर उस्कटल्या रेषा मोक्षदायिनींच्या, तुफान उठले मनात जैसे सात समुद्रांच्या, खलनिर्दालन देव कार्य ! मग कसला त्यास उशीर ? अधीर वेडे वीर निघाले सात शिवाचे तीर ! सात शिवाचे तीर !!!
रावांनी नेसरी येथे अवघ्या सहा शिलेदारांनिशी बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली. नेसरीचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले.
१३ फेब्रुवारी १६६०
शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस ‘गिफर्ड’ व त्याचा माल सोडून दिला.
१७ फेब्रुवारी १७७३
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी जिजाबाई (करवीर)यांचे पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर)येथे निधन
१७ फेब्रुवारी १७७४
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर रघुनाथराव हे पेशवे झाले
२१ फेब्रुवारी १६६५ (रात्री)
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवाजी महाराज छापा घालणार असल्याची खबर. इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे. त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ला भर रस्त्यावर ठार मारले होते कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.
२२ व २३ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली.
२४ फेब्रुवारी १६६५
मग मात्र शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, ” आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !” नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस “तिथीने” साजरा झालेला होता.
२४ फेब्रुवारी १६७०
छत्रपति शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी “सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब” यांना पुत्र लाभ झाला,”रामराजे” नाव ठेवण्यात आले,रामराजे पालथे उपजले,राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले… राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले. “रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील.”
२४ फ़ेब्रुवारी १६७० राजगड येथे शिवबा राजेंच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी राजाराम यांचा जन्म .
२४ फ़ेब्रुवारी १८१२
पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग
२४ फ़ेब्रुवारी १६७४
प्रतापराव गुजर यांना नेसरी येथे वीरमरण (वेडात मराठे वीर दौडले सात)

जानेवारी दिनविशेष

२ जानेवारी १६६१ 
इ.स. २ जानेवारी १६६१ या दिवशी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली.
मोरोपंत त्रिमल पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे. या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा – खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच ‘पेशवे’ झाले (दि.०३/०४/१६६२).
मोरोपंत पेशवे पंतप्रधान – ते हेच. स्वराज्यस्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.
३ जानेवारी १६७१ 
सरदार जसवंतसिंग व महाबतखान यास औरंगजेबाने दख्खनवर स्वारी करण्याविषयी आदेश दिला
५ जानेवारी १६६४, मंगळवार 
(प्रसंग – सुरतेवरील पहिली स्वारी)
शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, “इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.” सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. इनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केला.
५ जानेवारी १६७१ 
शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला. साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली.
६ जानेवारी १६६४, बुधवार - सुरतेवरील स्वारी
सुरत लुटीचा पहिला दिवस. सकाळी आकरा वाजता लूटीला सुरूवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. आख्खी जकात लूटली गेली. सुरतचा खुबसूरत सुभेदार इनायद खान “बहाद्दर” शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापार्‍यांना सहकुटूंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायतखानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळता भूई थोडी झाली.
६ जानेवारी १६६५ – सुवर्णतुला…. 
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते. या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला. स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्‍या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा ! केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा ! उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्‍या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव ! जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही. ही आमची संस्कृती आहे. “मदर्स डे” ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे. अभाग्या हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावा ! सोनोपंतांचे नाव आज खर्‍या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते.
६ जानेवारी १६७३ 
अनाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला. शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सर्फराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते.
७ जानेवारी १६६४, गुरूवार (सूरतेवरील प्रथम स्वारी) 
सुरतेच्या लुटीचा दूसरा दिवस. सकाळी दहा वाजता सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने वकिलामार्फत शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला. त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला. ही घटना पाहणार्‍या स्मीथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यावर वृत्तांत सांगितला. इस्कालिअट या व्यक्तिने हा वृत्तांत लंडनला कळवला. त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जसाच्या तसा….. “गुरूवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरूण मुसलमानाला शिवाजी बोलला की, ” या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुभेदाराला वाटते की काय?” त्यावर, ” आम्ही पण बायका नाही; हे घे” असे उलट बोलून तो तरूण शिवाजीच्या अंगावर खंजीर घेऊन धावला. त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसर्‍याने छाटला असताहि तो त्या भरात शिवाजीच्या अंगावर आदळून दोघेही कोलमडून पडले व शिवाजीच्या अंगावर दिसणार्‍या त्या खुनी मुसलमानाच्या रक्तामुळे शिवाजी मेला अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. पण तितक्यात शिवाजीने आपल्यास सोडवून घेतले व दूसर्‍याने त्या खून्याचे डोकेही फोडले. तेव्हा शिवाजीने तत्काळ कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्यांना समोर आणून उभे केले आणी मर्जीप्रमाणे हात, पाय, डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला. जेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला, ” त्यापेक्षा माझे डोकेच उडवा !” शिवाजीने ते मान्य करून त्याची टोपिही डोक्यावरून काढून ठेवली गेली. पण शिवाजीला काय वाटले कोणास ठाऊक त्याने एकाएकी कत्तल थांबवली व स्मिथ वाचला. तोपर्यंत ४ डोकी व २४ हात कापले गेले होते. त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मिथ वखारीत पाठवण्यात आला.” कसा भयंकर प्रसंग आहे हा ! गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले. महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या “परवानगीची” वाट न पाहता त्या मुसलमानाचा शिरच्छेद करून टाकला. समिती नेमणे ,पुरावे गोळा करणे, सज्जड दम देणे वगैरे भूरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते. दहशतवादाचे आव्हान अशाच प्रकारे संपूष्टात आणावे लागते.
८ जानेवारी १६५८
कल्याणहून शिवाजी महाराज जातीने माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी महाराजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली – भंडारगड – पळसगड , शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
८ जानेवारी १६६४, शुक्रवार (सुरतेवरील पहिली स्वारी) 
लूटीचा तिसरा दिवस. इनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहारांत आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती, त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडतांच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती ‘ट्रॉय” शहरासारखी झाली होती. प्रचंड आग ! गुरूवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसा धुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते. शुक्रवारीहि आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लूटीला तर खंड नव्हता. लूटीच्या पहिल्या दिवसापासून थैल्या भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही ते चालूच राहिले. रात्री मात्र लुटीचे काम जवळ जवळ संपत आले; तरीहि उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहानमोठी घरे पेटत होती.
१० जानेवारी १६६४, रविवार (सुरतेवरील प्रथम स्वारी) 
शिवाजी महाराजांचे सुरतेहून प्रस्थान. महाबत खान सुरतेच्या रक्षणासाठी येत असल्याची खबर.
१४ जानेवारी १६५८ 
कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवाजी राजे राजगडावर प्रथम राहावयास आले.
काय वाटले असेल राजगडाला ? कृतज्ञता ! गहीवर !! जन्माला आल्याचे सार्थक !!! राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला, तो हा दिवस. यापूर्वी शिवरायांची राजधानी होती – किल्ले पुरंदर.
१५ जानेवारी १६५६. 
छापा घालून जावळी काबीच. हणमंतराव मोरे ठार. मग्रूर चंद्रराव मोरे जावळीतून रायरी उर्फ रायगडावर फरार. शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोर्‍यांच्या तुर्‍यातले एक अमूल्य रत्न मिळाले. या रत्नाचे नाव होते – मुरारबाजी देशपांडे.
१६ जानेवारी १६६६, पहाटे ३ वाजता… 
शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावर पराभव. १००० मावळे ठार. शिवाजी महाराजांचे विशाळगडाकडे पलायन. या घटनेने हिंदुपतपातशाहीतील समिकरणे बदलली. नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना वेळेवर कुमक करू शकले नाहीत, म्हणून नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले. कुडतोजी गुजरांना ‘प्रतापराव’ ही पदवी देऊन सरनौबती दिली.
२० जानेवारी १६७४ 
दिलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी तो उधळून लावला. हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला ? काही माहिती उपलब्ध नाही. या लढाईत दिलेर खानाचे १००० लोक ठार झाले. सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत ठार झाले.
२१ जानेवारी १६६२ 
आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यातसामील करण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी कोकण स्वारीस प्रारंभ केला
दि.२३ जानेवारी १६६४ (शालिवाहन शके १५८५, माघ शु.५) 
शाहजी राजे यांचे कर्नाटकात होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना अपघाती निधन.
२५ जानेवारी १६६५ 
शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन
२६ जानेवारी १६७१ 
 महाराजांना वेळो वेळी मोहिमेवर जावे लागे , अशा वेळी आईसाहेब सर्व राज्यकारभार पाहात असे , माञ अता आईसाहेब वुद्ध झालात . आईसाहेब राज्यकारभार योग्य रितीनी सांभाळात असे म्हणून अता त्याच्या मदतीस आजच्या ता . २६ जाने १६७१  रोजी संभाजीराजांची निवड महाराजांनी केली.
 २६ जानेवारी १६७४
अकबर २६ जाने १६७४ रोजी तो आसदखाना बरोबर काबुलच्या स्वारीवर गेला . शिवाजी महाराजांनी २६  जानेवारी रोजी ला पहाटे उंदेरीच्या आरमार जवळ आले .
२६ जानेवारी १६६२शास्ताखान सोबत आलेल्या मोगली फौजेचे पवनमावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या परिसरात चढाया
२८ जानेवारी १६४५ 
शिवरायांनी रांझ्याचा पाटिल – बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला म्हणून दोनही हात व दोनही पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली.
२८ जानेवारी १६४६
शिवाजीराजांचे ‘मराठी राज्याची राजमुद्रा’ वापरून लिहिलेले पहिले उपलब्ध पत्र. रांझ्याच्या पाटलाचे तोडले हातपाय
२८ जानेवारी १८५१  
दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूर जवळ बिठूर उर्फ ब्रम्हावर्त येथे निधन
३० जानेवारी १६८१ 
संभाजी महाराज यांनी बुऱ्हाणपूर शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर सतरा पूरे लुटून अलोट संपत्ती मिळविली. त्यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूरचे दरवाजे बंद करून घेतले

Tuesday, 18 December 2012

आज्ञापत्रांतील दुर्गप्रकरण

आज्ञापत्रांतील दुर्गप्रकरण

गडकोटांचे महत्व

संपूर्ण राज्याचें सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजाभग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरी राज्य असें कोणास म्हणावें ? याकरीतां पूर्वी जे जे राजे झाले त्यांनी आधी देशामध्यें दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला, आणि आलें परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हें राज्य तर तिर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशानवश न होय त्या त्या देशीं स्थलविशेष पाहून गड बांधिले, तसेंच जलदुर्ग बांधिले, त्यावरून आक्रमण करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून येऊन विजापूर भागानगरांसारखीं महासंस्थानें आक्रमिलीं, संपूर्ण तिस-बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यांशी अति श्रम केला, त्याचे यत्नास असाध्य काय होतें? परंतु राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला. या उपरही ज्यापेक्षां राज्य संरक्षण करणें आहे, त्यापेक्षां अधिकोत्तर साधनी स्वतां गड किल्ल्याची उपेक्षा न करितां परम सावधपणें असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी. नूतन देश साधणें. त्या देशांत जीं स्थळें असतील ती महत्प्रयासाने हस्तवश करावीं ज्या देशात गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरहद्दीपासून पुढे जबरदस्तीनें नूतन स्थळें बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळांचे आश्रयीं सेना ठेवून पुढील देश स्वशासनें वश करावा. असें करीत करीत राज्य वाढवावें. गडकोटाचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलुखीं टिकाव धरून रहावत नाही. फौजेविरहित परमुलखी प्रवेश होणेंच नाहीं. इतक्याचें कारण, गडकोटविरहित जें राज्य त्या राज्याची स्थिति म्हणाजे अभ्रपटलन्याय आहे. याकरितां ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण, असें पूर्ण चित्तांत आणून कोणाचे भरंवशावर न राहतां आहे त्यांचे संरक्षण करणें, व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानूं नये.

गडाची रचना व बांधणी

राज्यरक्षणाचें मुख्य कारण किल्ले, देशोदेशीं स्थळें पाहून बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत किल्ल्यासमुदायी आसूं नये. कदाचित असला तरी सुरूंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा. सुरूंगास असाध्य असा असला तरी तोहि जागा मोकळी न सोडिता बांधून मजबूत करावा.
गडाची इमारत गरजेची करूं नये. तट, बुरूज, चिलखतें, पाहारे, पडकोट जेथें जेथें असावे ते बरे मजबूत बांधावे, नाजूक जागे जे असतील ते सुरूंगादि प्रयत्नेंकरून, अवघड करून, पक्की इमारत बांधोन गडाचा आयब काढावा. दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून, पुढें बुरुज देऊन, येतिजाती मार्ग बुरूजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिंता गड पाहून, एक दोन तिन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्यें हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या. इमारतीवरील मामलेदार वगैरे आदिकरून ठेवाणें ते बरे शहाणे, कृतकर्मे, निरालस्य पाहून ठेवावे. गडाची इमारत मुस्तेद करावी. कित्येक किल्ले प्रत्तेक पर्वताचे आहेत. कित्येक पर्वत थोर थोर, त्याचा एखादा कोन, कोप-याची जागा पाहोन बांधावा लागतो. त्यास दरवाजापुढें अथवा तटाखालीं मैदानभुमी लागते, म्हणजे तो गड भुईकोटांत दाखल जाहला. आला गनीम त्यानी दरवाजास अथवा तटास लागावें असेम होतें ही गोष्ट बरी नव्हे. याकरितां जातीचा किल्ला असेल त्यास आधीं सर्व प्रयत्ने दरवाज्यापुढें तटाखाली जितकें मैदान असेल तितका खंदक खोल आणी रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधोन त्यावर भांडी, जुंबरे ठेवून, खंदकाचे कडेस एकाएकी परकी फौज येऊन न पावे असें करावें. गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तर ते मार्ग मोडून, तावर झादी वाढवून आणखीकडे परके फौजेस येतां कठीण असे मार्ग घालावे. याविरहित बलकबुलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालूं देऊं नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाज्याचा राबता करुन सांजवादा चढवीत जावा.

गडाची राखण

गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें एक काठीही तोडों न द्यावी. बलकबुलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावया कारणाजोगे असों द्यावे. गडासभोवती नेहमी मेटे असावी. घेरीयाची घस्ती करीत जावी. घस्तीचा जाब मेटेकरी यांणी देत जावा. गडाखालतें इमारतीचें घर किंवा घराभोंवतें दगडाचें कुसूं सर्वथा असो न द्यावें. तसेंच गडावर आधीं उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणी तें स्थळ तों आवश्यक बांधणे प्राप्त झालें तरी आधी खडक फोडून तळीं, टांकी पर्जन्यकाळपर्येंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशीं मजबूत बांधावीं. गडावरी झराही आहे, जसें तसें पाणीही पुरतें, म्हणुन तितकियावरीच निश्चिंती न मानावी. उद्योग करावा, किनिमित्य कीं, झुंजामध्यें भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें याकरीतां तसे जागीं जखिरियाचें पाणी म्हणून दोन चार टाकीं तळीं बांधावीं. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें. गडावरी राजमंदिराविरहित थोर इमारतीचें घर बांधो नये. राजमंदिरासही भिंती इटांच्या बांधून त्यास चुना दाट गच्च घालावा. घरांत कोठें उंदिर, विंचू, किडा , मुंगी राहील अशी दरद न ठेवावी. घरास कुसूं पाहीजे तें निरगुंडी आदिकरून झाडांचें पातळ घालावें. गडकरी यांणी राजमंदिर म्हणून खाली न ठेवावें. सर्व काळ करून धुरे करुन घर शाबूत राही, जीव जंतु न राही तें करावें. धनी गडावरी येतात असें कळतांच आगोदर दोन चार दिवस मामलेदारानें येऊन, खासा उभा राहून, संपुर्ण घर सारवून, रांगोळी आदिकरून घालून धनी गडावरी येईतोपर्येत त्याच जागा सदर करून बसत जावें. गडावरील मार्गा मार्गावरील बाजारांत तटोतट केर कसपट किमपी पडो न द्यावें. ताकीद करून झाला केर गडाखाली न टाकतां जागाजागी जाळून ती राखही परसांत टाकून घरोघर होईल ते भाजीपाले करवावें.

गडावरील साहित्य व युद्धाची सामुग्री

गडावरील धान्यगृहें, इस्तादेचीं घरें, ही सकळही (आहेत त्यास) अग्नी, उंदिर, किडा, मुंगी वाळवी यांचा उपद्रव न बाधे अशी भुईस दगडांची छावणी करून गच्ची बांधावी. ज्या किल्ल्यास काळा खडक दरजेविरहीत असेल तसे ठिकाणी ते कड्यास टांकी करावी. स्वल्पमात्र दरज असेल तरी गच्च लावून पाझर न फुटे असें करावें. गच्चंस अरेना अशी भुई असेल तेथें गच्चीघरें करून थोर थोर कांचेचे मर्तबान, झोलमाठ, मडकी आणून त्यांस मजबूत बैसका करून त्यांत तेल तूप सांठवावें. दारूखाना घराजवळ घराचे परिघाकाली नसावा. सदरेपासून सुमारांस जागा बांधून भोंवते निरगुंडी आदिकरून झाडांचें दाट कुसूं घालून बांधावें. तयास तळघर करावें. तळघरांत गच्च करावा. त्यांत माच घालून त्यावर दारूचे बस्ते, मडकी ठेवावे. बाण, होके, आदिकरून मध्यघरांत ठेवावे. सर्दी पावों न द्यावी. आठ पंधरा दिवसांत हवालदाराने येऊन दारू, बाण, होके आदिकरून बाहेर काढून उष्ण देऊन मागुती मुद्रा करुन ठेवीत जावें. दारूखान्यास नेहमी राखणेस लोक ठेवावे. त्यांणी रात्रं दिवस पहा-या प्रमाणे जागत जावें. परवानगीविरहित आसपास मनुष्या येऊं न द्यावे. किल्ला संरक्षणाचे कारण ते भांडी व बंदुका, याकरीता किल्ल्यांत हशम ठेवावेत (ते) बंदुकीचे ठेवावेत. तट सरनोबत, बारगीर, सदर-सरनोबत, हवालदार यांसी बंदुकीचा व भांडी डागायचा अभ्यास असावा. (संपुर्ण हशमांनी तलवार, टाकणी हेही हत्यारें बाळगीत जावी.) गड पाहून, गडाचे नाजूक जागे पाहून, त्या त्या जागी व गडाचे उपराचे जागां त्या त्या सारिखी भांडी, जुंबरे, चरक्या आदिकरून यंत्रे बुरुजाबुरूजांत तटोतट टप्पेगुजरे बांधून ठेवावी. भांडीयांचे गाडे, चरक, भांडी पाहून मजबूत लोखंडी कट देऊन त्यावर ठेवावीं. दारूच्या खलित्या, गज, भांडी निवावयाच्या कुंच्या, गोळे, कीट आदीकरून रेजगिरी सुपरी प्रमाणे लहानथोर नदीतले खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या, तरफा, काने, दुरूस्त करावयाचे सामते, आदिकरून हा जिन्नस भांडियांचा भांड्याजवळ हमेशा तयार असावा. अहिनी दगडी जिन्नस दारूचे अंतरी ठेवावे. होके, बाण हेही पहारेपहा-यास तयार असों द्यावे. दरम्यान, मुलखांत गनीम कोठें आहे, येईल ते समयीं कोठीतून आणून तयार करीन म्हणेल तो मामलेदार नामाकूळ, आळशी. तशास मामला सांगों नये. एक वेळ केली आज्ञा त्याप्रमाणे अंधपरंपरेनें निरालस्यपणें उगेंच वर्तावें, तरीच समयीं दगा होत नाहीं, लावून दिला कायदा अव्याहत चालतो. पर्जन्यकाळी भांडीयास व दरवाज्यास तेल मेणे देऊन भांडियांचेही कोने मेणानें भरून भांडियांवर भांडियापुरती आघाडी घालून जायां होऊं न द्यावीं. वरकडही जिन्नस सर्दी न लागे असे आबादान ठेवावे. इमारतीचे काम आधीं तयार झालेंच असतें. तथापि तट, पहारे, बुरूज, कोट, काहिं जायां होतच आहे ते वरचेवरी मजबूत करावे लागतात. तटास झाड वाढतें तें वरचेवरी कापून काढावें. तटाचें व तटाखालील गवत जाळून गड नाहाणावा लागतो.

गडाचा कारखाना.

या कामास गडोगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमी ठेवून मुद्राधारी यांचे स्वाधीन करावा. तसेंच गोलंदाज विश्वासूक कबिलेदार, नेमिला जागा दुरूस्त मारणार, असे मर्दान, गड व गाडाचीं भांडी पाहून जितके लागत असतील तितके ठेवावे. गडावरी झाडें जीं असतील ती राखावीं. याविरहित जीं जीं झाडे आहेत तीं फणस, चिंच, वड, पिंपळ, आदिकरून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे, आदि करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जें झाड होत असेल तें गडांवर लावावें, जतन करावें. समयी तितकेही लांकडाचे तरी प्रयोजनास येतील. गडोगडी ब्राम्हण, ज्योतिषी, वैदिक, व्युत्पन्न तसेंच रसायण वैद्य व झाडपाल्याचे वैद्य व शास्त्र वैद्य, पंचाक्षरी, जखमा बांधणारे, व लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांच्याही गड पाहून एक एक दोन दोन असाम्या करून ठेवावे. लहानसहान गडांवर या लोकांचे नित्य काम पडतें असें नाही, याकरिता त्यांचे कामाची हत्यारें त्यांजवळी तयार असों द्यावीं. जे समयीं काम पडेल ते समयी काम करितील, नाहीं ते समयी आदिकरून तहशील तलब चाकरी घ्यावी. रिकामे न ठेवावे. गडोगडीं तनखा, दास्ताद, इस्तान आदिकरून गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करून ठेवावेंच लागतें. याविरहित गड म्हणाजे आपले कार्याचे नव्हेत, असें बरें समजून आधीं लिहिलेप्रमाणें उस्तवारी गडाची करावी.

(आज्ञापत्रावरून)